औरंगाबाद: औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडेय हे चांगल्या प्रकारे काम करीत असून महापालिका क्षेत्रात अजून मुलभूत सुविधांची आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेसाठी भरघोस निधी द्यावा, अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी सोमवारी विधान परिषदेत अर्थसंकल्पावरील पुरवणी मागण्यावरील चर्चेत केली. कचरा संकलनासाठीच्या वाहनात दगड माती भरून संबंधित एजन्सीने पालिकेची फसवणूक केल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. खंडपीठात विधीज्ञांसाठी ६१.२२ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या इमारतीसाठी शासनाचा हिस्सा म्हणून सहा कोटी ६३ लाख रुपये द्यावेत, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग घटकांच्या मदतीसाठी तरतूद केलेल्या दहा कोटींचा निधी, साहित्यिक व कलावंतांच्या साह्यासाठी जिल्हास्तरावर तरतूद केलेल्या दहा कोटींत वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली.